पालक क्रीडा स्पर्धा
मुलांसाठी शाळा नेहमीच क्रीडा स्पर्धा आयोजित करून शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न करत असते पण या वर्षी शाळेने मुलांबरोबरच पालकांसाठीही क्रीडास्पर्धा आयोजित केल्या. याचा मुख्य उद्देश पालकांना खेळाचे महत्व समजावे व मुलांना खेळासाठी पोषक वातावरण तयार व्हावे तसेच पालकांची शाळेशी जवळीक साधावी यासाठी लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो हे मैदानी खेळ व बैठे खेळ असे प्रत्येक वर्गाचे ६ संघ तयार केले. ६०१ पैकी ३१२ पालक यात सहभागी झाले होते. अतिशय उत्साहाने हा आगळा वेगळा उपक्रम मा.मुख्याध्यापिका सौ.सुनिता चव्हाण यांच्या संकल्पनेअंतर्गत पार पडला. या क्रीडास्पर्धांचे उदघाटन आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मा.श्री.सुभाष बर्गे व बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणअधिकारी मा.संजय जाधव साहेब यांच्या हस्ते झाले.पालकांनी या क्रीडा स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेतला. अगदी स्वत:चे वय विसरून पालक खेळले व दरवर्षी अशा क्रीडास्पर्धा पालकांसाठी आयोजित कराव्यात अशी विनंती पालकांनी मा.मुख्याध्यापिकांना केली. यातच या उपक्रमाचे यश होते. पालकांसाठी मैदानी स्पर्धा घेणारी आपली शाळा ही पहिली शाळा ठरली याचा सर्वांना अभिमान आहे. या उपक्रमाची सर्व बारामतीत खूपच वाहवा झाली.
शिक्षक कथाकथन स्पर्धा
विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये अनेक स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी मा.मुख्याध्यापिकांच्या प्रोत्साहनाने शिक्षक कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. यात शाळेच्या या वर्षीच्या उपक्रमाला अनुसरून खेळाडूंच्या जीवनप्रसंगावर आधारित उत्कंठावर्धक कथा शिक्षकांनी मुलांना सांगितल्या. यातून जिद्द, चिकाटी, प्रयत्न, आत्मविश्वास, यश खेळातून मिळणे शक्य होते हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसले व खेळांच्या स्पर्धांसाठी त्यांची मानसिकता तयार होण्यास मदत झाली.
आंतरराष्ट्रीय स्टेडियम भेट
या वर्षीचा प्रकल्प “खेळातून आरोग्यसंवर्धन” या अंतर्गत बारामती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्टेडियमला आपल्या ३०० विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह भेट दिली या भेटीत मा.श्री.उत्तमराव धोत्रे स्टेडियम व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण स्टेडियमचे व्यवस्थापन कसे ठेवले जाते ? लॉन कटिंग मशीन, पीच मेकिंग, स्टेडियम वरची सिंचन व्यवस्था या सर्व गोष्टींची माहिती दिली व प्रथमच विद्यार्थ्यांनी स्टेडियमची रचना पाहिली. या आंतरराष्ट्रीय स्टेडियमला क्षेत्रभेट देणारी आपली शाळा ही पहिली शाळा ठरली. याचाही अभिमान वाटतो.
आंतरशालेय स्तरावर तसेच शाळा व जिल्हा स्तरावर शिक्षक व विद्यार्थ्यांची भरीव कामगिरी
दरवर्षी म.ए.सो आंतरशालेय क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो.या क्रीडा स्पर्धा जिंकून शाळेने सलग तीस-या वर्षे अत्यंत मानाचा समजला जाणारा म.ए.सो क्रीडा करंडक मिळवून शाळेच्या व क्रीडा क्रीडावर्धिनीच्या पर्यायाने म.ए.सो च्या इतिहासात सोनेरी नोंद केली आहे.
चॅम्पियन कराटे क्लब यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कु.श्रुती शंकर करळे या या विद्यार्थिनीला सुवर्णपदक व सायकल हे पारितोषिक मिळाले. तसेच याच स्पर्धेत सिद्धी शंकर करळे हिला ब्रॉंज मेडल तर आयुष शंकर करळे याला सिल्वर मेडल मिळाले.
कारभारी अण्णा चषक या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा सातव हायस्कूल बारामती या ठिकाणी झाल्या या स्पर्धेत चि.हर्षद संदीप शिंदे या विद्यार्थ्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
शिक्षक पुरस्कार
आपल्या शाळेतील सहशिक्षिका सौ.जयश्री अशोक लोंढे यांना या वर्षीचा नगर परिषद बारामती गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला.शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.हिंगसे सुजाता प्रदीप यांना “वर्षा क्रिएशन पुणे” यांच्या तर्फे दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. तसेच सौ.मंजिरी राहुल दोशी यांना तालुकास्तरीय उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
शाळेला भेट दिलेल्या मान्यवर व्यक्तींचा तपशील खालील प्रमाणे
मंगळवार दिनांक ४/०९/२०१८ रोजी ‘खेळाडूंची मुलाखत’ या उपक्रमांतर्गत कु.गौरी गावडे (राज्यस्तरीय अॅथलेटिक्स खेळाडू) यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी त्यांच्या खेळाबाबत म्हणजेच लांबउडी, धावणे व चेसबॉल याविषयी मनसोक्त चर्चा केली. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली यात त्यांनी त्यांना खेळाची प्रेरणा कोणाकडून मिळाली ? खेळाचा सराव कसा केला? त्या राज्यस्तरीय खेळापर्यंत कशा पोहचल्या? याबाबत त्यांनी मुलांशी संवाद साधला.
दि. १६/१०/२०१८ रोजी शाळेत पालक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या उपक्रमाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मा.श्री सुभाष बर्गे व गटशिक्षणाधिकारी बारामती पंचायत समिती मा.संजय जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मा. श्री सुभाष बर्गे यांनी सर्व पालक स्पर्धकांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या व हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या मा.MUKHYADHYAPUIKANCHE मुख्याध्यापिकांचे मनापासून कौतुक केले तर मा.श्री संजय जाधव साहेब यांनी जगावे कसे? यावर एक कविता सादर केली
दि. २९/१२/२०१८ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सतीश ननावरे (बारामती भूषण आयर्नमॅन) यांनी उपस्थिती लावली.त्यांचा आयर्नमॅन होण्याचा प्रवास त्यासाठीचे परिश्रम खेळाचे महत्व त्यांनी विद्यार्थी व पालकांना उलगडून सांगितले.
दि.२९/३/२०१९ रोजी इ.४ थी चा निरोप समारंभ व इंद्र्धनुष्य हस्तलिखित प्रकाशन मा.डॉ.शिवाजीराव गावडे प्रसिद्ध व्यंगचित्रकार (दै.सकाळ) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना व्यंगचित्रांचे उत्तम प्रात्यक्षिक दाखवून सहजसुलभ रेषातून व्यंगचित्र कसे रेखाटावे याबद्दल मार्गदर्शन केले.व चित्र म्हणजे विविध रेषांचा नियोजनबद्ध समूह हे समजावून दिले.
शाळेत स्थापन केलेल्या महिला तक्रार समितीअंतर्गत मा.अॅड. निलीमाताई गुजर यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन महिलांचे हक्क, महिलांसंदर्भात कायदे, सायबरगुन्हे, ते होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या वर्षीचा शाळेचा प्रकल्प ‘खेळातून आरोग्यसवर्धन’ या अंतर्गत विद्यार्थ्यांची डॉक्टरांशी चर्चा घडवून आणण्यात आली. यात प्रसिद्ध डॉ.उज्वला शेखर कोठारी यांनी मुलांना आरोग्य, आहार व खेळाचे महत्व किती अनन्यसाधारण आहे हे चर्चेतून पटवून दिले तसेच शिक्षकांच्या आरोग्याबद्दलही अध्यापक प्रबोधिनीत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
श्रावणी शुक्रवारचे औचित्य साधून बारामतीतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ मा.डॉ.अश्विनकुमार वाघमोडे यांनी मुलांचा आहार व आरोग्य याविषयावर पालकांना मार्गदर्शन केले.
इतर शाळांशी तुलना करता शाळेची खास वैशिष्ट्ये
ETH संगणक प्रणालीचा प्रथम वापर करणारी बारामती शहरातील एकमेव प्राथमिक शाळा, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ETH सुरु करण्यात आले आहे.
आंतरशालेय नाट्यछटा व कथाकथन स्पर्धा-
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त-कलागुणांना वाव मिळावा व व्यासपीठ मिळावे या हेतूने शाळेच्या रौप्य महोत्सवापासून आपल्या शाळेतर्फे दरवर्षी आंतरशालेय नाट्यछटा व कथाकथन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
माझी विद्यार्थी मेळावा –
स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०१८ रोजी शाळेत झेंडावंदनासाठी सर्व आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. माझी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांशी संपर्क साधून जास्तीत जास्त संख्येने झेंडावंदनासाठी उपस्थित राहण्याचे ठरवले होते. सर्व माजी विद्यार्थी झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आपापल्या वर्गात जाऊन बसले, आपापल्या बाकावर बसले.शाळेच्या काही आठवणी त्यांनी एकमेकांना सांगितल्या व जुन्या आठवणीत हे विद्यार्थी रमले.आपापल्या शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनी अनेक फोटो काढले व त्याही आठवणी जतन करण्याचा प्रयत्न केला.
शाळेची शैक्षणिक, सामाजिक, क्रीडाविषयक, सांस्कृतिक वाटचाल
सन २०१८-१९ या वर्षीच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडक प्रयोग निवडण्यासाठी अगोदर शाळेत विज्ञान प्रदर्शन घेतले गेले. यात प्रत्येक वर्गातून साधारणपणे १८ ते २० प्रयोग मांडले गेले व यामध्ये ३२० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून १२ प्रयोगांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पहिले तीनही क्रमांक शाळेने पटकावले व हाही शाळेने मिळवलेला उच्चांक होता. तसेच पणदरे येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कु सिद्धी तेजसिंग गाडे या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
शाळेत जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त ‘प्रतिज्ञा लेखन’ हस्ताक्षर स्पर्धेत प्रत्येक वर्गातून तीन उत्कृष्ट लेखन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
खेळातून आरोग्य संवर्धन’ या विषयाला धरून प्रत्येक इयत्तेचे एक हस्तलिखित तयार केले आहे.
पुस्तक हंडी
शाळेत दरवर्षी दहिहंडी ही पुस्तकहंडी म्हणून साजरी केली जाते. इ. ४ थी च्या मुलांच्या व मुलींच्या गोविंदा पथकाने पुस्तकहंडी फोडल्यानंतर ती पुस्तके विद्यार्थ्यांना भेट दिली जातात.यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते तसेच दहीहंडीचे मनोरे रचताना एकजूट, सहकार्य, सामंजस्य वाढीस लागते.
सामाजिक बांधिलकी
शाळेतर्फे रिमांड होम येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.४ थी च्या विद्यार्थीनींनी रिमांड होम येथे जावून तेथील मुलांना राखी बांधली व शाळेतर्फे त्या मुलांना खाऊ दिला.
पालक निबंध स्पर्धा
वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पालकांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.निबंध स्पर्धेसाठी पालकांना खालील विषय देण्यात आले होते
- मुलांसाठी खेळाचे महत्व.
- मुलांचे आरोग्य.
- माझ्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी करत असलेले प्रयत्न या स्पर्धेत एकूण ११२ पालकांनी निबंधलेखन केले. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देवून गौरविण्यात आले.
शाळेची क्रीडाविषयक वाटचाल
माहेवार आसने व सूर्यनमस्कार स्पर्धा- यावर्षी ‘खेळातून आरोग्यसंवर्धन’ या प्रकल्पाअंतर्गत माहेवार आसने घेण्यात आली. दररोज आसनांचा सराव व प्रात्याक्षिके घेण्यात आली. जानेवारी महिन्यात सूर्यनमस्कार व आसनस्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेमुळे मुलांना व्यायामाची आवड निर्माण झाली.आत्मविश्वास वाढला व लहान वयातील चंचलता कमी होण्यास मदत झाली.
शाळेची सांस्कृतिक वाटचाल
स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रांतिकारकांच्या जीवनावरील प्रसंग नाट्यातून इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय तडफदारपणे सादर केले. तर इ १ ली व २ री ने देशभक्तांच्या वेशभूषा करून छोटे छोटे संवाद सादर केले.यात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, शिरीषकुमार यांच्या जीवनावर आधारित बालनाट्यांचे सर्वांनाच खूप कौतुक वाटले.
वसुंदरा वाहिनी बारामती-
या वाहिनीद्वारे प्रत्येक वर्गाने बालदिनासाठी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले यामध्ये पोवाडे, क्रांतिकारकांचे जीवनचरित्र, कथाकथन, समूहगीत, अभंग, बालगीत, बालनाट्य, इंग्रजी नाटुकले सादर केले. यावर्षीच्या शाळेच्या प्रकल्पाला धरून विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व सांगणारी व त्यातून आरोग्य विकास कसा होतो? हे सिद्ध करणारी लघुनाटिका सादर केली. त्यामुळे खेळाचे महत्व हा विषय बारामती परिसरात घ्रराघ्ररात पोहोचला.
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
हे मुल्यांवर आधारित होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे संपूर्ण वर्ग या स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात समाविष्ट होते.
आव्हानात्मक परिस्तिथी
शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी तबलावादक उपलब्ध होत नव्हते त्यावेळी तबल्याची साथ कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला.त्यावेळी शाळेतील इ.४ थी चा विद्यार्थी चि.श्री योगेश दिवेकर या विद्यार्थ्याने सराव करून गीतांना तबल्याची उत्तम साथ दिली. उपस्थित मान्यवरांसहित सर्वांनीच त्याचे खूप कौतुक केले.
शाळेचे मैदान प्रशस्त असल्याने जोराचा वारा, प्रचंड धूळ याचा खूपच त्रास होतो. यावर उपाय म्हणून शाळेच्या व्हरांडयातील ग्रीलला हिरवे कापड बांधून हा होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला.
यावर्षी शाळेने हाती घेतलेला ‘पालक क्रीडा स्पर्धा’ हा उपक्रम अतिशय यशस्वी झाला. परंतु तो उपक्रम नवीनच असल्याने त्याच्या खर्चाची तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे अतिशय कमी बजटमध्येच या उपक्रमाचे आयोजन केले व त्यासाठी होणारा खर्च हा वार्षिक स्नेहसंमेलनातील साउंड सिस्टीमचा खर्च टाळून त्या खर्चातून करण्यात आला.त्यामुळे पैशाची बचतच झाली.